भूमिका

ग्रामीण गरिबी दूर करणे हे प्रगती अभियानचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी संस्था ग्रामीण गरिबांसोबत काम करते. गरिबीच्या काचातून बाहेर पडण्यासाठीचे पर्याय त्यांच्या सहभागाने व साथीने शोधणे असे या कामाचे स्वरूप आहे.


ग्रामीण गरिबीचा प्रश्न शेतीच्या प्रश्नाशी जवळून जोडलेला आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने शेतीचा विकास केला, त्याला फलोत्पादन व भाजीपाला अशा नगदी पिकांची जोड दिली तर त्यातून परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. पण हे साध्य करण्यासाठी विविधांगाने प्रयत्नांची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याची, त्यांना आपल्या जमीन हक्कांची जाणीव करून सक्षम करण्याची आवश्यकता आहे. विविध शासकीय योजनांची व बाजारपेठेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणेही गरजेचे आहे. अशा प्रकारे लोकांचे सक्षमीकरण झाले की शेतीविकासाला गती मिळेल. याबरोबरीनेच गरीबांना खात्रीचे काम मिळण्यासाठी व गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी रोजगार हमीसारख्या सामाजिक सुरक्षेच्या, तसेच अन्नसुरक्षेची हमी देणाऱ्या योजना अस्तित्वात असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
ग्रामीण विकास साधून गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी दोन पातळ्यांवर विचार व्हायला हवा. शेतीची उत्पादकता व त्यातून मिळणारे उत्पन्न वाढायला हवे त्याचबरोबर अत्यंत गरीब व गरजू लोकांकरिता सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजनाही असायला हव्यात व त्यांची चोख व प्रभावी अंमलबजावणी होईल याची खबरदारी घ्यायला हवी. याच ध्येयाने प्रगती अभियानाची वाटचाल चालू आहे.