राधाबाई चंद्रकांत कुवर

मी राधाबाई चंद्रकांत कुवर, या गावची सरपंच. रोजगार हमीवर मजुरी केलेल्या आदिवासी राधाबाई मोठ्या आत्मविश्वासानं स्वत:ची ओळख करून देतात तेव्हाच रोजगार हमीनं आदिवासींच्या, मजुरांच्या आणि महिलांच्या जगण्यात काय बदल आणलाय याची प्रचिती येते. नाशिक जिल्ह्यातल्या अतिदुर्गम पेठ तालुक्यातल्या आमलोण गावात त्यांना रोहयोमधून 1 कोटींची कामं केली. गावाच्या गरजेची कामं काढली. मजुरांना, महिलांना कामापर्यंत आणलं, कायद्यानुसार कामाच्या साईटवर पाळणाघर, सावली आणि औषधपेटीची सोयही केली. त्यांच्या या नेतृत्वगुणामुळे आणि संघटनकौशल्यामुळे गावानं त्यांना निवडणुकीसाठी उभं केलं. प्रस्थापित पक्षाचा जोरदार सामना करत त्या निवडून आल्या आणि गावच्या सरपंचही झाल्या. हे शक्य झालं ते रोहयोमुळेच.


महाराष्ट्रात सर्वप्रथम आकाराला आलेल्या या योजनेने लोकांना खात्रीचा रोजगार देऊन दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा आणि जगणे सुसह्य करण्याचा एक मार्ग दाखवून दिला. याच योजनेला पुढे कायद्याचे कोंदण मिळाले. रोजगाराचा हक्क देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आणि भारत हा देशातील एकमेव देश. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या तीन गोष्टी साध्य होतात हे आम्ही सिद्ध केले –
1. गरजू मजुराच्या हाताला काम मिळते
2. गावाच्या विकासाला शाश्वत संसाधने निर्माण होतात.
3. लहान शेतकऱ्याला त्याच्या शेताचा विकास करता येतो.

मोतीराम भांगरे पेठ तालुक्यातल्या घोसाळी गावचे.

तीन एकराची शेती पण खडकाळ. त्यामुळे रोजमजुरी पाचवीलाच पुजलेली. प्रगती अभियानच्या कार्यकर्त्यांशी त्यांची गाठ पडली ती एका गावबैठकीत. त्यांनी रोजगार हमी चांगली समजून घेतली आणि गावात राबवण्यात पुढाकार घेतला. गावात 11 विहिरींची कामं काढली. स्वत:ची शेती सुधारली आणि इतर शेतकऱ्यांच्या सिंचनाहीची सोय झाली. खडकाळ माळरानावर आंबे लावले, काजू लावले. रोजगार हमीच्या मदतीनं हा शेतमजूर बागायतदार झाला आणि कोरडवाहू गावही सिंचनाखाली आलं. म्हणूनच घोसाळीच्या ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायतीवर बिनविरोधात निवडून दिलं.

More Info

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरचं बाल्किस गाव.

नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातलं. पावसानंतर दरवर्षी पोटासाठी स्थलांतरित होणारं. पण गावातल्या काशिनाथ मिसाळनं प्रगती अभियानचं प्रशिक्षण घेतलं. गाव कार्यकर्ता झाले. गावकरी, ग्रामपंचायत यांच्या मदतीनं रोहयोची कामं काढली आणि एका वर्षात 10 लाखांचं काम केलं. गरजू मजुरांना गावातच रोजगार मिळाला आणि गावासाठी 50 हजार रोपांची लागवड.

More Info

हट्टीपाडा.

त्र्यंबक तालुक्यातलं गाव. प्रत्येकाची जमीन पण फक्त घरापुरतंच पीक. भात, वरई, नागली, उडीद. पावसाळा संपला की डोक्यावर शिधा घ्यायचा आणि नाशिकची वाट धरायची असं सक्तीचं स्थलांतर. हट्टीपाड्याचे सरपंच नाना वारे प्रगती अभियानच्या एका शिबिरात आले. रोजगार हमीची माहिती घेतली आणि त्यांच्या गावात योजना राबवली. गावासाठी बंधारा बांधला. शेतकऱ्यांना पाणी मिळालं आणि गरज होती तेव्हा गावातच रोजगार.

More Info

चिंचओहोळचे रघुनाथ चौधरी.

रोजगार हमीच्या कामातून शेतकऱ्याला त्याच्या शेतात विहीर खणता येते, त्याची मजुरीही मिळते आणि शेताला पाणीही हे कळालं. रघुनाथभाऊंनी विहिरीसाठी अर्ज केला. त्याच्या मंजुरीपासून प्रत्यक्ष निधी मिळेपर्यंत खूप संघर्ष केला. खूप अडचणी आल्या पण त्यावर पद्धतीरपणे मात केली. आज त्यांच्या बागेत काजू लागलेत. त्यांच्या उत्पन्नात खात्रीशीर वाढ झालीए आणि भविष्याही सुधारलंय.

More Info

राजू ढवळे,आंबेवाडी

रोजगार हमी योजनेवरचा मजूर ते ग्रामरोजगार सेवक आणि ग्राम रोजगार सेवक ते ग्रामपंचायत सदस्य हा थक्क करणाऱ्या प्रवास आहे आंबेवाडीच्या राजू ढवळेचा. बारावी शिकलेला राजू रोहयोच्या कामावर मजूर म्हणून काम करत होता. उत्सुकता आणि उत्साह यामुळे संस्थेच्या बैठकांना उपस्थित राहायचा. रोहयोची कामं कशी निघतात, कामांची मागणी कशी करायची, मोजमाप कसं करायचं, त्यांच्या नोंदी कशा ठेवायच्या हे सारं व्यवस्थित समजून घ्यायचा. त्यामुळेच त्यानं त्याच्यासह गावातल्या 85 मजुरांच्या रोजगाराची सोय केली. म्हणूनच गावकऱ्यांनी ग्राम रोजगार सेवक म्हणून त्याची नियुक्ती केली. राजू इथवरच थांबला नाही. गावात निवडणूक आली. त्यानं गावातल्या तरुणांचं पॅनल उभं केलं आणि 11 पैकी 7 सदस्य निवडूनही आणले. आज तेच मजूर आणि तरुण गावाच्या विकासाचा अजेंडा ठरवताहेत तो रोजगार हमीच्या माध्यमातून.

More Info

अस्वली हर्ष गावचा शंकर पुजारी.

गरीब कोकणा आदिवासी. त्यात अपंग त्यामुळे जास्तच कुचंबणा. संस्थेच्या संपर्कात आल्यावर शंकरभाऊंनी ठरवलं रोजगार हमी राबवायची. काम निघालं पण यंत्रानं. शंकरभाऊंनी लढा दिला, रोहयो लोकांच्या रोजगारासाठी आहे. शासन दरबारी तक्रार केली आणि मजुरांच्या हाताला काम मिळवून दिलं. रोहयोसोबतच पुढे रेशन, विहिरी ही कामंही हाती घेतली आणि गावातल्या गरिबांच्या अन्नाचा, रोजगाराचा प्रश्न सोडवला. स्वत:चा विकास साधलाच आणि गावाचाही.

मी राधाबाई चंद्रकांत कुवर, या गावची सरपंच. रोजगार हमीवर मजुरी केलेल्या आदिवासी राधाबाई मोठ्या आत्मविश्वासानं स्वत:ची ओळख करून देतात तेव्हाच रोजगार हमीनं आदिवासींच्या, मजुरांच्या आणि महिलांच्या जगण्यात काय बदल आणलाय याची प्रचिती येते. नाशिक जिल्ह्यातल्या अतिदुर्गम पेठ तालुक्यातल्या आमलोण गावात त्यांना रोहयोमधून 1 कोटींची कामं केली. गावाच्या गरजेची कामं काढली. मजुरांना, महिलांना कामापर्यंत आणलं, कायद्यानुसार कामाच्या साईटवर पाळणाघर, सावली आणि औषधपेटीची सोयही केली. त्यांच्या या नेतृत्वगुणामुळे आणि संघटनकौशल्यामुळे गावानं त्यांना निवडणुकीसाठी उभं केलं. प्रस्थापित पक्षाचा जोरदार सामना करत त्या निवडून आल्या आणि गावच्या सरपंचही झाल्या. हे शक्य झालं ते रोहयोमुळेच.

More Info