मूठभर पेरून खंडीभर पिकायचं, आता खंडीभर पेरून गोनभर पिकतंय…….

शिवखंडीच्या शंकर बाबा चौधरींची खंत

आदिवासी अल्पभूधारक शेतकरी नागली पिकाला देव मानतात, पण त्याचं उत्पादन मात्र घटत चाललं आहे. असं का होतंय हे समजून घ्यायला शेतकरी कुटुंबांशी चर्चा केली. त्यातलंच एक कुटुंब नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील शेवखंडी गावातले शंकर बाबा चौधरी यांचं. शेतकरी म्हणून त्याचं नाव सर्वपरिचित कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत ते वर्षाला ८० ते ८५ क्विंटल नागली पिकवायचे आणि घरासाठी राखून लोकांना सवायीने म्हणजे धान्याच्या बदल्यात धान्य परतफेडीच्या बोलीवर गरजू लोकांना वाटायचे. एवढं मोठं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यानेपण काही काळाने नागलीकडे पाठ फिरवली. असं का झालं? असं विचारल्यावर आपली नाराजी बोलून दाखवत ते म्हणाले, ‘आता नागलीचं उत्पादन घटलं आणि कष्ट मात्र वाढले. नागलीच्या एका कांडीला ३ नाहीतर ४ फुटवे येतात. पहिल्यासारखं उत्पन्न होतंच नाही. मग मी नागली पेरणं कमी केलं आणि भाताचं क्षेत्र वाढवलं. ’     

‘नविन पद्धतीनं लागवड करूया, उत्पन्न नक्की वाढेल’, असं सांगितलं तरी शंकर बाबांना पटलं नाही. पण त्यांची मुले, सुना, एक पुतण्या यांनी ही नवी पद्धत समजून घेण्यात रस दाखवला. एका नव्या उत्साहानं त्यांना प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात केली. 

सुरुवातीला गादी वाफे करून पेरणी कशी करायची माहिती देऊन ती करायला मदत केली. यासाठी काडेपेटीच्या दोन खोक्यात मावेल एवढंच बियाणं वापरलं. फार बियाणं वापरायची गरजच नाही. चार ते पाच दिवसात वादळी पावसानं हजेरी लावली, ज्यानं वाफ्यावरील रोपांची उगवण क्षमता तयार झाली. गादीवाफ्यावरच्या नागली पिकाच्या रोपांची निंदणीचं (तण व्यवस्थापनाचं) काम कुटुंबियांनी केलं. त्याचबरोबरीनं जमिनीची तयारीही केली. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे राब करणं पूर्ण बंद. त्याऐवजी पहिल्यांदा ट्रॅक्टरनं शेत नांगरलं आणि पंधरा दिवसांनी दुसरी नांगरणी बैलांच्या घेऊन केली. जमिनीवरचा केरकचरा अन् दगड बाजूला केलं आणि रोपांच्या लागवडीसाठी शेत सज्ज झालं. गादी वाफ्यावर अवघ्या दोन काडीपेट्या बियाणांपासून रोपं तरारून आली. नागलीची ही रोपं बघून शंकर बाबांना आनंदित झाले. “अरे मी शेती करत होतु तवा मूठभर पेरून खंडीभर पिकायचं, आता खंडीभर पेरून गोनभर पिकतं नाय…….” अशी खंत असणाऱ्या शंकरबाबांना दोन काडीपेटीची खोकं म्हणजे चिवळीभर बियांणं लागलं हे पाहून आनंद झाला. 

नागली रोप १८ ते २१ दिवसांची झाल्यावर सरी पद्धतीने पुनर्लागवड कशी हे त्यांना समजून सांगितलं. दोरीनं सरी आखून दोन सरींमध्ये दीड फूट आणि दोन रोपांमध्ये १ फूट अंतर राखून लागवड केली. कुठल्याही रासायनिक खतांचा वापर करू दिला नाही.

लागवड करतांना वापरायचं जीवामृत तयार करायची पद्धतीही शिकवली. लागवडीपूर्वी रोपांचं मूळ जीवामृतामध्ये बुडवून जमिनीत लावलं. पूर्वी बियाणं फेकून लागवड केली जायची, पण आता एकेक रोप टोचून पुर्नलागवड केली. काडीपेटीच्या दोन खोक्यातल्या नागली बियाणांपासून गादी वाफ्यावर तयार झालेली रोपं पूर्ण जवळपास दीड एकरावर सरी पद्धतीने लावली.

लागवडीनंतरची मशागतही महत्त्वाची. मटका खत तयार करून पुढे दर पंधरा दिवसांनी २० लिटर पाण्यात ५० मिक्स करून फवारण्याची माहिती दिली. त्याप्रमाणे शंकर बाबांनी पंधरा दिवसाच्या पाळीप्रमाणे फवारणीला सुरुवात केल्यामुळे साधारण २५ ते ३० दिवसांनी ३ ते ४ फुटवे यायला सुरवात झाली आणि शंकर बाबाला या प्रयोगाचा निकाल मिळाला. ३५ ते ४० दिवसांनी एका रोपाला १५-२० तर काही रोपांनी २०-२२ फुटवे आले. बाबांना खूप आनंद झाला. “माझी चूक माझ्या ध्यानात आली,” असं म्हणाले आणि पूर्ण गावात नागली प्रयोगाचा प्रचार करायला सिद्ध झाले. पारंपरिक पद्धत बदला आणि नवी पद्धत अंमलात आणा असं ते त्यांच्या गावातल्या आणि शेजारच्या गावातल्यांना सांगू लागले. पिके फुलोऱ्यावर आल्यावर कीड रोग येऊ नये म्हणून निम ऑईलची फवारणी आणि अधूनमधून निंदणी करायला सांगितले होते, तेदेखील शंकर बाबांच्या कुटुंबाने चोख केले.

१०५ ते ११० दिवसांनी पीक तयार झाल्यावर उत्पन्नाचा अंदाज घ्यायला आम्ही संस्थेची टीम गेलो. क्रॉप कटींगचे प्रात्यक्षिक केले तेव्हा केवळ पेठ तालुक्यातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यात नागली प्रयोगात सहभागी सर्व शेतकऱ्यांमध्ये शंकर बाबांचा प्लॉट १ नंबरचा ठरला. १२ क्विंटलपर्यंत नागली उत्पादन मिळाले. कृषी विभागाने त्यांना प्रयोगशील शेतकरी घोषित केले. पूर्वी शंकर बाबांनी नागलीचे भरघोस पीक घेतले, त्याची त्यांना आठवण झाली. त्यांच्या अनुभवापासून प्रेरणा घेत पहिल्या वर्षातील नागली शेतकऱ्यांची संख्या २२ होती ती दुसऱ्या वर्षी जवळपास दुप्पट होऊन ४२ झाली. एकूण ३५ एकरावर नव्या पद्धतीने नागली लागवड झाली.

                                                           चंद्रकांत कुवर, सीआरपी, पेठ

Leave a Comment

Your email address will not be published.