![](http://pragatiabhiyan.org/wp-content/uploads/2022/07/Farmer-who-took-....motiram-bhangahre-1024x768.jpg)
मोखाडा तालुक्यातील सडकेच्य कडेला वसलेलं सडकवाडी हे साधारणे पाचशे लोकसंख्येचं आदिवासी बहुल गाव. गावातले बहुतेक लोक शेती आणि मजुरीवर अवलंबून असलेले.
रमेश सक्रू बरफ हे याच सडकवाडीतील एक तरुण प्रगतशील शेतकरी. वय पस्तीस-चाळीस च्या आसपास. बारीक अंगकाठी. आणि मनमिळाऊ स्वभाव. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. शेतीही पाच एकराच्या आत. घरात चार मुलं, पत्नी आणि आजारी आई असा परिवार.
आपलं शिक्षण फक्त तिसरीपर्यंत झालं याची खंत त्यांच्या मनात आहे. एक दिवस त्यांनी मला त्यांचं शिक्षण का मध्येच सुटलं हे सांगितलं. किस्सा फारच अजब होता. ते म्हणाले, “आम्हाला शाळेत शिकवायला एक बाई होत्या. शाळेत यायच्या त्याच जाम दारू पिऊन. आम्हा मुलांकडून खूप कामं पण करून घ्यायच्या. शिकवायच्या काहीच नाही, पण त्यांची लाकडे वगेरे आणणं, बाकी वैयक्तिक कामं करतील त्यावरून मुलांचं पास-नापास ठरवायच्या. कामाला नाही म्हटलं तर मारायच्या. या त्यांच्या कामाला आणि माराला कंटाळून मी शाळा सोडली….” रमेशभाऊ हसत हसत हा किस्सा सांगतात, पण आपण शिकू शकलो नाही याची खंत त्यांना वाटते.
घरातले सगळ्यात मोठे असल्या कारणाने लग्न झालं अन् घरातील जबाबदाऱ्या अंगावर आल्या. तसं त्यांनी शेतीकडेच पूर्ण लक्ष दिलं आणि भात, नागली, वरई, उडीद, खुरसणी ही पिकवायला सुरुवात केली.
नागली हे डोंगराळ भागातले वरकस जमिनीत येणारे एक मुख्य पीक. बदलते हवामान, पावसाची अनियमितता, कीड रोग यांमुळे पूर्वीपेक्षा नागलीचे उत्पादन घटले, त्यामुळे शेतकऱ्यांनी नागली लागवडीचे क्षेत्र कमी कमी करत आणलं. खरंतर शरीरासाठी पौष्टिक, आजारांवर गुणकारी आणि कुपोषणाला उत्तम पर्याय ठरणारं हे गुणकारी पीक, पण काळाच्या ओघात नागली शेतकऱ्यांकडूनच दुर्लक्षित झालं.
साधारण मे २०१९ मध्ये प्रगती अभियानने सडकवाडीमधील शेतकऱ्यांना नागली विकास कार्यक्रमाची ओळख करून दिली. रमेशभाऊ हे प्रयोगशील शेतकरी असल्याने ते यासाठी तयार झाले. नागली लागवडीची सुधारित पद्धत शिकून घेऊन त्याची चोख अंमलबजावणी त्यांनी केली. राब सोडून गादीवाफा बनवला, बियाणं फेकून लावण्याऐवजी नागली रोपांची पुनर्लागवड केली, आणि सरी पद्धतीने व्यवस्थित अंतराने रोपं लावली. हे बदल करण्यात पुढाकार घेतलेल्या रमेशभाऊंना त्यांच्या कष्टाचे फळही लगेच मिळाले. आधी त्यांना एकरी २.५० ते ३ क्विंटल उत्पन्न व्हायचे, तेच आता ४.५० ते ५ क्विंटल म्हणजे दीड पटीने वाढले. पहिल्या वर्षी काही मोजके शेतकरी सहभागी झाले. त्यांची नागलीने फुललेली शेतं बघून पुढच्या वर्षी २०२० मध्ये खरीप हंगामात सहभागी शेतकऱ्यांची संख्या बरीच वाढली. पण पावसानं अचानक दडी मारली. तरीही टोचून लागवड केली असल्यानं नागली जळली नाही आणि उत्पन्न व्यवस्थित आलं.
पुढे शेतकऱ्यांसाठी गट तयार करायची कल्पना संस्थेने मांडली. त्याही वेळी पुढाकार घेत रमेशभाऊंनी बाकी शेतकऱ्यांना गटाचं महत्त्व पटवून दिलं. सर्वांची कागदपत्रं जमा केली. एकेक करत शेतकरी जोडले. इथल्या ‘शिवशंभो गटाचे’ आज रमेशभाऊ अध्यक्ष आहेत.
गावातले बहुतेक शेतकरी लहान आहेत. त्यांची गुजराण फक्त शेतीवर होत नाही. बिगर शेती हंगामात स्थलांतर करावे लागते. रोजगार हमी राबवून स्थलांतर रोखता येईल, गावातच रोजगार निर्माण करता येईल, याची संस्थेने माहिती दिली. लोकांचा समज होता की रोहयोत कोणती कामं घ्यायची हे सरकार ठरवतं. प्रशिक्षणातून त्यांचा गैरसमज दूर झाला. गावात कोणकोणती कामं करायची हे ग्रामस्थांनी ग्रामसभेत चर्चा करून ठरवायचे, पंचायत समितीला सुचवायचे आणि पंचायत समितीकडून मान्यता मिळाली की गावातली कामं सुरू होतात – ही प्रक्रिया त्यांना समजली. नाशिकमध्ये प्रशिक्षणाला येऊन रमेशभाऊंनी रोहयोची सखोल माहिती करून घेतली. नमुना चार काम मागणी अर्ज भरणे, कामाचे मोजमाप, कामाची मजुरी, खात्यात पैसे जमा होण्याचा कालावधी या सर्व टप्प्यांची रमेशभाऊंना व्यवस्थित माहिती झाली. त्यामुळे गावात रोहयोच्या कामातही त्यांनी पुढाकार घेतला. आता आपले प्रश्न घेऊन लोक त्यांच्याकडे येतात. रेशन कार्ड बनवणे ,घरगुती गॅसचे प्रश्न, घरकुलांचे प्रश्न इत्यादी सामाजिक प्रश्नांवरही रमेशभाऊ पुढे होऊन काम करतात.
प्रयोगशील सामाजिक कामात पुढाकार घेणारे रमेशभाऊ आता गावातील प्रश्नांचं पुढारपण करू लागले आहेत. ‘बिन पगारी पण फुल अधिकारी’ या जिद्दीनं आणि आपलेपणानं ते लोकांच्या मदतीला तयार असतात.
आनंद बांबळे
![](http://pragatiabhiyan.org/wp-content/uploads/2022/07/Farmer-who-took-.....motiram-bhangare-peth-2-1024x683.jpg)