जाणीवजागृती व प्रशिक्षणे
मनरेगाच्या आखणी व अंमलबजावणीत सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाच्या (गावकरी, पंचायत सदस्य, सरकारी कर्मचारी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामरोजगार सेवक) क्षमता विकासाचे काम प्रगती अभियान करत आहे. तसेच नागली उत्पादकता या विषयावरही शेतकऱ्यांच्या क्षमताबांधणीचे काम संस्था करत आहे.
ग्रामरोजगार सेवक प्रशिक्षण
प्रत्यक्ष गावपातळीवर लोकांसोबतचे काम आणि सरकारी यंत्रणेसोबत समन्वयाचे काम या दोन्हीच्या अनुभवातून ‘ग्रामरोजगार सेवक प्रशिक्षण’ हे मोड्यूल तयार झाले आहे. रोहयो मजूर आणि
अंमलबजावणी यातील दुवा म्हणजे रोजगार सेवक. या पदावरील व्यक्तीची भूमिका व जबाबदारी महत्त्वाची आहे. ती पेलण्यासाठी या रोजगार सेवकाला माहिती, कौशल्ये व दृष्टिकोनाच्या
बाबतीत सक्षम करणे हा या मोड्यूलचा हेतू आहे. त्याचा लाभ या पदावरील व्यक्तीलाही होतो आणि नरेगा मजुरांनाही.
गावसमुदायाचे प्रशिक्षण
मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करायची तर स्थानिक नागरिकांकडेही माहितीचे बळ पाहिजे. त्यादृष्टीने गावातील युवक, सामाजिक कार्यकर्त्यांना तयार करणारे, मनरेगाची सर्व सखोल माहिती व जाण देणारे हे प्रशिक्षण आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावात प्रगती अभियानने गावकऱ्यांच्या सहभागाने रोहयोची कामे यशस्वीपणे पार पाडली आहेत. त्या अनुभवाच्या आधारे या प्रशिक्षणाची आखणी केली गेली आहे.
सरपंच प्रशिक्षण
गावातील निर्णयप्रक्रियेतील एक मुख्य व्यक्ती या नात्याने सरपंच व इतर लोकप्रतिनिधींना मनरेगाची सखोल माहिती असणे जरूरीचे आहे. मनरेगातून कामाच्या हक्काची हमी दिली आहे याची जाणीव लोकप्रतिनिधींना होणे व योजना मिळवण्यासाठीचे नियम व कार्यपद्धती समजावून देणे असे या प्रशिक्षणाचे स्वरूप आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
मनरेगाची कामे ज्या विविध सरकारी खात्यातून निघतात व पाहिली जातात, म्हणजे शेती, महसूल, मनरेगा यंत्रणा आणि अन्य विभाग, अशा सरकारी यंत्रणेतील विविध कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना मनरेगातील त्यांची भूमिका समजावून देणारे हे प्रशिक्षण आहे.
नागली उत्पादकता प्रशिक्षण
हे प्रशिक्षण नागली उत्पादक शेतकऱ्यांसाठी असून त्यामध्ये या पिकासाठीचे सुधारित तंत्रज्ञान, सेंद्रीय खते, मशागत आदींचा समावेश आहे. ज्यामध्ये लागवडीपासून ते कापणीपर्यंत सर्व टप्प्यांवर शेतकऱ्याला माहिती आणि सहाय्य दिले जाते आणि नैसर्गिक शेतीतून नागलीचे उत्पादन वाढवण्याचे तंत्र शिकवले जाते.
For customized training requirements, organizations can contact us by filling up the following google form.
Google form