अल्पभूधारक शेतकरी

महाराष्ट्रातले बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहेत, कारण त्यांच्याकडील जमिनींचे प्रमाण सरासरी ५ एकरापेक्षा (२ हेक्टरपेक्षा) कमी आहे. शिवाय, यातील बहुतेक शेतकरी केवळ पावसाच्या पाण्यावर शेती करणारे आहेत, कारण राज्यातील सिंचित जमिनींचे प्रमाण केवळ २०% आहे. त्यामुळे शेतकरीसमूह सर्वात वंचित असहाय्य स्थितीत आहे. वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट होते. अशा शेतकऱ्यांना उपयोगी तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत नेले आणि बाजारपेठेची समज उपलब्धता विकसित केली तर त्यांच्याकडील मर्यादित जमिनींची उत्पादकता आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते. तसेच ग्रामीण शेतकरी जर संघटित झाले, त्यांना तंत्रज्ञान, बाजारपेठेची अद्ययावत माहिती अवगत झाली तर त्यांच्या उत्पन्नात कमालीचा फरक पडेल त्यातून गरिबी निर्मूलन साधणे शक्य होईल. हे काम संस्था विविध उपक्रमातून करत आहेत.  

आत्मा (ATMA) शेतकरी गट

शेतीपूरक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी गावपातळीवरआत्माशेतकरी गट तयार करण्याची Agricultural Technology Management Agency (ATMA) योजना २००५०६ मध्ये सुरू झाली. प्रत्येक राज्यात आत्मा ही शेतकरीकेंद्री नोंदणीकृत सोसायटी तयार केली असून जिल्हा गाव पातळीवरील शेतकरी गट, पंचायती राज संस्था, स्वयंसेवी संस्था, कृषी विज्ञान केंद्रांना त्याचे सदस्य होता येते. ज्यामुळे सदस्यांना तांत्रिक सहाय्य, आधुनिक शेतीपद्धतींचे प्रशिक्षण तंत्रज्ञान यांचा लाभ घेता येतो.

गावपातळीवर शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देऊन आत्मा शेतकरी गट तयार करण्यासाठी प्रोत्साहन आणि सहाय्य देण्याचे काम आम्ही करत आहोत. या गटांना आता शेती विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकेल. शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत माहिती पोहोचवण्यासोबतच उत्पादन वाढीसाठी सहाय्य आणि बाजारपेठेची हमी देण्यासही या योजनेची मदत होऊ शकेल.

पीक विमा

दुष्काळ किंवा अन्य आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्याचा उद्देश असलेल्या प्रधान मंत्री पीक विमा योजनेची  माहिती योग्य प्रकारे लहान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. लहान शेतकऱ्याचे बाजारासाठीचे पीक कमी असते, बहुतेकांचे पीक कर्जही नसते. त्यामुळे पीक विमा काढण्याचे काम त्यांनाच करावे लागते. विमा भरण्याची प्रक्रिया त्यांना जिकिरीची वाटते. त्यामुळे त्याचे लाभ त्यांना मिळत नाही. या उपयुक्त योजनेची माहिती पोहोचवून लहान शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा काढण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. योजनेबद्दल जागृती करून छोट्या सीमांत शेतकऱ्यांना पीक विमा घेण्यासाठी सहाय्य करण्याबरोबरच या योजनेतील त्रुटी निदर्शनास आणून देण्याचे कामही संस्था करत आहे. योजनेची अंमलबजावणी अधिक चोखपणे व्हावी आणि धोरणात्मक त्रुटीही दूर व्हायला हव्यात, यांवर संस्थेचा भर आहे.

डाळींबशेतीचा पर्याय

कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी फळबागांचा पर्याय आहे आणि डाळींबासारख्या चांगला भाव देणाऱ्या फळांचे उत्पादन करणे शक्य आहे. पण यासाठी शेतकऱ्यांकडे आवश्यक ज्ञान पाहिजे आणि सुरवातीला लागणाऱ्या खर्चाची तरतूद पाहिजे. तसे झाले तर शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतो हा प्रगती अभियानाच सटाणा (नाशिक) आणि मोहोळ (सोलापूर) या दोन तालुक्यातल्या कामाचा अनुभव आहे.

तीन वर्षे या दोन शेतकऱ्यांसोबत काम केले, त्यांना तंत्रज्ञान अवगत करून दिले, विविध प्रयोगातून सुरुवातीच्या लागवडीचा खर्च कमीत कमी करत आणला आणि यातून शिकून शेतकऱ्यांनी डाळींबशेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला अाहे.