आमची प्रेरणा

डॉ.अशोक कोतवाल

डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये योगदान देणारे नामवंत अर्थतज्ज्ञ अशोक कोतवाल यांचा प्रगती अभियानशी एक भावनिक संबंध होता. ते प्रगती अभियानचे मार्गदर्शक होते आणि प्रगती अभियानच्या जवळच्या मित्रांपैकी एक होते. त्यांचे जाणे हे  प्रगती अभियानचे मोठे नुकसान आहे.

ऐंशीच्या उत्तराधार्त आणि नव्वदच्या सुरवातीला डॉ. अशोक कोतवाल आणि डॉ. मुकेश ईश्वरन यांनी शेतीच्या अर्थकारणावरील लिहिलेल्या संशोधनपर लेखांकडे जगातील या विषयांचा अभ्यास करणाऱ्या अर्थतज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले. हे संशोधन आजदेखील अनेक विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाचा भाग असतात. त्यानंतर काळातच  या दोघांनी लिहिलेले ‘व्हाय पॉवर्टी पर्सिस्टस् इन इंडिया ‘हे पुस्तक प्रकाशित झाले. अर्थशास्त्राचे कोणतेही ज्ञान नसलेल्या कोणालाही  भारतातील  दारिद्र्याची कारणे  अत्यंत सोप्या भाषेत समजावून  पुस्तक हे सगळ्या जगभर नावाजले गेले. अर्थशास्त्र कसे शिकवावे याचे हे पुस्तक म्हणजे एक आदर्श उदाहरण  आहे.

अशोक कोतवाल हे फक्त विद्यापीठाच्या  चौकटीतील अर्थतज्ज्ञ नव्हते. अर्थतज्ज्ञांना लोकांबरोबर काम करणाऱ्या संस्थांपेक्षा काही विशेष ज्ञान असते हे त्यांना मान्य नव्हते आणि अर्थतज्ज्ञांनी नेहमी जमिनीवर काम करणाऱ्या लोकांचे अनुभव समजून घेत राहिले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. याच भूमिकेतून  ते प्रगती अभियानच्या कामात सहभागी झाले. प्रगती अभियान करत असलेल्या प्रत्येक प्रकल्पात त्यांचा बौद्धिक आणि मानसिक सहभाग असे. प्रगती अभियानाला आर्थिक मदत मिळवण्यातदेखील त्यांचा मोठा सहभाग होता. ते विश्वस्त असलेल्या सीवा ( कॅनडा इंडिया व्हिलेज एड) या संस्थेने भरीव आर्थिक मदत केली.

अशोक कोतवाल यांचे एक मोठे योगदान म्हणजे त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेले ‘आयडीयाज फॉर इंडिया ‘ हे वेब नियतकालिक. अशोक कोतवाल हे त्याचे प्रमुख संपादक होते.  जगभरातील भारताच्या विकासाच्या विविध पैलूंवर संशोधन करणारे अर्थतज्ज्ञ या नियतकालिकात धोरणकर्त्यांना आणि पत्रकारांना समजेल अश्या भाषेत आपले संशोधन मांडत असतात. आज हे नियतकालिक अतिशय प्रतिष्ठा पावले आहे. अशोक कोतवाल  त्यांच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत या नियतकालिकाचे काम करत राहिले. अशोक कोतवालांचे  व्यक्तिमत्व प्रगती अभियानमधील आम्हा सर्वाना नेहमीच प्रेरणा देत राहील.

अशोक कोतवाल यांच्या  वृत्तपत्रात प्रकाशित झालेलया काही लेखांच्या लिंक्स

https://indianexpress.com/article/opinion/columns/aadhaar-that-doesnt-exclude-biometric-authentication-5061326/

https://www.financialexpress.com/opinion/creating-and-sustaining-growth-in-india-what-would-make-economic-growth-in-the-country-

https://www.theindiaforum.in/article/what-would-make-india-s-growth-sustainable

https://www.hindustantimes.com/india/this-is-not-a-pipeline/story-um9cfVrrutMaZrx3Yx9C5O.html

https://www.hindustantimes.com/india/for-rich-or-for-poor/story-E3saBgd9JsEHCY7qksbJ5N.html

https://www.hindustantimes.com/analysis/wto-has-a-point-in-objecting-to-india-s-food-security-act/story-i28GrzzmjYpKGebxIwCbUI.html

https://www.livemint.com/Opinion/JVxQpBpgzzz8XL9rluiLnO/Protectionism-under-the-guise-of-food-security.html