गरिबी आणि वंचितता दूर करण्याचे काम सुटे सुटे करता येत नाही. प्रभावी व दूरगामी बदल होण्यासाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते, अभ्यास, धोरणकर्ते, प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि आर्थिक सहाय्य देणाऱ्या संस्था यांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.
गाव पातळीवर काम करताना स्वयंसेवी संस्थांना अनेक अडचणी येतात. त्यातले काही प्रश्न अंमलबजावणीशी निगडित असतात, पण काही प्रश्न धोरणात्मक त्रुटींशीही निगडित असतात. असे योजना वा धोरणाच्या आखणीशी संबंधित प्रश्न यंत्रणेने सोडवावे लागतात, ज्यासाठी सातत्याने संवादाची व पाठपुराव्याची गरज असते. यासाठी समविचारी संस्था, अभ्यासक, संशोधक संस्था, आर्थिक सहाय्य देणाऱ्या संस्था यांना मिळून काम करावे लागते.
अभ्यासक संस्था अंमलबजावणीतील अडथळ्यांचे सखोल विश्लेषण मांडू शकतात, तर संस्थांचा प्रत्यक्ष लोकांसोबतच्या कामाचा अनुभव वास्तवातील गुंतागुंत समोर आणू शकतात. असे अभ्यासात्मक व विश्लेषणात्मक काम करण्यासाठी लागणारे आर्थिक बळ सहाय्यक संस्था देऊ शकतात. या एकत्रित प्रयत्नातून समस्यांचे स्वरूप, ते सोडवण्याचे पर्याय, त्यांची व्यावहारिकता इत्यादी बाबी लक्षात येतात. कोणकोणत्या त्रुटी आहेत, त्यासाठी काय केले पाहिजे, त्यासाठी कोणती पाऊले उचलली पाहिजेत - हे चित्र अशा सामूहिक प्रयत्नातून स्पष्ट होते. आणि ही अभ्यास व संवादाची प्रक्रिया सातत्याने करण्याची गरज असते. ज्यामुळे लोकांच्या दृष्टीने अधिक उपयुक्त धोरणे आखणे आणि अंमलबजावणीतील त्रुटी लक्षात घेऊन त्या दूर करणे शक्य होते.