महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) ७ सप्टेंबर २००५ पासून देशात लागू झाला.
प्रत्येक ग्रामीण कुटुंबातल्या प्रौढ व्यक्तींना एका वर्षामध्ये रोजगार म्हणून १०० दिवसांचे अकुशल काम मिळेल, ही हमी या कायद्याने दिली.
ग्रामीण भागाचे चित्र पालटून टाकण्याची क्षमता या कायद्यामध्ये आहे. याच विश्वासाने प्रगती अभियानने अगदी सुरुवातीपासून मनरेगाचा कार्यक्रम हाती घेतला. कायद्याची चोख अंमलबजावणी व्हावी याकरिता जाणीवजागृती आणि काम मागणीचे प्रशिक्षण देण्यास संस्थेने नशिक जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये सुरुवात केली. मनरेगाच्या वेगवेगळ्या घटकांना धरून गावातील स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांची क्षमता बांधणी केली आणि मनरेगावर काम करणाऱ्या मजुरांचे अधिकार समजून दिले. स्त्रियांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला आणि कामाच्या ठिकाणी पाळणाघरे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी सोईसुविधांची माहिती त्यांना दिली.
लोकांची समज वाढल्याने कामाची मागणी वाढली आणि शेतीची कामे संपली की मनरेगाची कामे होऊ लागली. या कामात सातत्य आल्याने लोकांचा विश्वास वाढला, रोजगारासाठीची वणवण व त्यासाठी होणारे स्थलांतर कमी झाले. त्यामुळे महिलांचे व मुलांचे आरोग्य व स्वास्थ्य सुधारले आणि मुलांच्या शिक्षणात खंड पडला नाही, हे बदल महिला आवर्जून सांगतात. शिवाय मनरेगातून जल, माती संवर्धनाची विविध कामे झाल्यामुळे सिंचन सुविधा उपलब्ध होऊन शेतीला फायदा झाला.
नाशिक जिल्ह्यातल्या मोजक्या तालुक्यातल्या आदिवासी समुदायांपासून सुरू झालेले हे काम आता आणखी जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे. गाव पातळीवरील जाणीवजागृतीपासून शासकीय यंत्रणेकडे एडव्होकसीपर्यंत - असा या कामाचा व्यापक पल्ला आहे. मनरेगाच्या कामाचा भरीव अनुभव व ज्ञान संस्थेच्या गाठिशी असून ते प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य रूपात इतर संस्थांपर्यंत नेण्याचे कामही आम्ही करत आहोत.

मनरेगाच्या आखणी व अंमलबजावणीत सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाच्या (गावकरी, पंचायत सदस्य, सरकारी कर्मचारी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामरोजगार सेवक) क्षमता विकासाचे काम प्रगती अभियान करत आहे. त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण मोड्यूल संस्थेने तयार केली आहेत.
मनरेगा मजूर आणि अंमलबजावणी यंत्रणा या दोन्हींना जोडणारा दुवा म्हणजे रोजगार सेवक. ग्रामरोजगार सेवकाची भूमिका व जबाबदारी महत्त्वाची असून ती पेलण्यासाठी आवश्यक माहिती, कौशल्ये आणि दृष्टिकोन देऊन सक्षम करणे हा या प्रशिक्षणाचा हेतू आहे.
गावातील निर्णयप्रक्रियेतील एक मुख्य व्यक्ती या नात्याने सरपंच व इतर लोकप्रतिनिधींना मनरेगाची सखोल माहिती असणे जरूरीचे आहे. मनरेगातून कामाच्या हक्काची हमी दिली आहे याची जाणीव लोकप्रतिनिधींना होणे व योजना मिळवण्यासाठीचे नियम व कार्यपद्धती समजावून देणे असे या प्रशिक्षणाचे स्वरूप आहे.
मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करायची तर स्थानिक नागरिकांकडेही माहितीचे बळ पाहिजे. त्यादृष्टीने गावातील युवक, सामाजिक कार्यकर्त्यांना तयार करणारे, मनरेगाची सर्व सखोल माहिती व जाण देणारे हे प्रशिक्षण आहे.
मनरेगाची कामे ज्या विविध सरकारी खात्यातून निघतात व पाहिली जातात, म्हणजे कृषी, महसूल, ग्रामीण विकास आदी विविध विभागांना मनरेगातील त्यांची भूमिका समजावून देणारे आणि अंमलबजावणीसाठी समन्वय वाढवण्यावर भर देणारे हे प्रशिक्षण आहे.
महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील ज्या स्वयंसेवी संस्थांची मनरेगावर काम करण्याची इच्छा आहे त्यांना प्रशिक्षण व अंमलबजावणी सहाय्य करण्याचे काम संस्था करते. ही प्रशिक्षणे संस्थांच्या गरजांच्या अनुरुप प्रत्यक्षात घेतली जातात, तसेच कोविड लॉकडाऊन काळापासून ऑनलाईन प्रशिक्षणांचीही सुरुवात करण्यात आली आहे.
एखाद्या गावात मनरेगाचे काम रूजायला साधारण किती कालावधी लागतो? - तर या प्रश्नाचे उत्तर साधारण तीन वर्षे असे आहे. हे उत्तर आमच्या अनुभवावर आधारित आहे. मनरेगाची कामे गावात केवळ सुरू होणे पुरेसे नाही तर ही कामे मजुरांना हव्या असलेल्या काळात सुरू व्हायला हवीत, मागणी असलेल्या सर्वांना पुरेसे काम निघायला हवे आणि प्रत्येक वर्षी मनरेगा कामे सुरळीतपणे सुरू व्हायला हवीत. पहिल्यांदा गावकऱ्यांना माहिती होते, कायद्यातील तरतुदी समजतात आणि त्यामुळे कामाची मागणी वाढू लागते, नंतर त्या मागणीनुसार कामे काढण्यासाठी ग्रामपंचायतीतील यंत्रणा सज्ज व्हावी लागते, कामे निघण्यासाठी आणि चालू असलेल्या कामांचे मोजमाप व पेमेंट वेळेनुसार होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून वेळेवर प्रतिसाद मिळावा लागतो - ही घडी बसण्यासाठी कामे सुरू होते - हे कामाचे चक्र गावात स्थिरावण्यासाठी साधारण तीन वर्षांचा कालावधी लागतो हा आमचा अनुभव आहे.
मनरेगा अंमलबजावणीचे हे तीन वर्षांचे मॉडेल राज्यातल्या विविध जिल्ह्यात आजमावून पाहण्याची संधी आम्हाला २०१९ मध्ये मिळाली. यातून महाराष्ट्रातल्या एकूण 13 जिल्ह्यातल्या 17 तालुक्यांमध्ये मनरेगाची कामे सुरू केली. जिथे यापूर्वी मनरेगाचे फारसे काम झालेले नाही अशी गावेही यात समाविष्ट आहेत. अर्थात यासाठी सुरुवातीपासून नियोजनपूर्वक काम केले, स्थानिक सहभाग मिळवला, कार्यकर्त्यांच्या क्षमता विकसित केल्या आणि ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीपर्यंत सर्व ठिकाणी सातत्याने पाठपुरावा केला.
मनरेगावर अनेकजण काम सुरू करतात. पण मागणी करूनही कामे सुरू न होणे, पुरेसे काम न निघणे, कमी पेमेंट मिळणे व पेमेंट मिळायला होणारा उशीर होणे - असे अनुभव आल्याने लोक नाराज होतात, मनरेगा नको म्हणू लागतात. मात्र जेव्हा लोकांकडे नीट माहिती असते, आत्मविश्वास असतो, पाठपुराव्याची तयारी असते तेव्हा शासकीय यंत्रणेला आपली अनास्था सोडून लोकांच्या मागणीला प्रतिसाद द्यावाच लागतो. याच विश्वासावर आधारित हे मॉडेल आहे. मनरेगाचा नकारात्मक अनुभव पुसून टाकण्यासाठी ते नक्कीच उपयुक्त आहे.
क्लस्टर रिसोर्स पर्सन (सीआरपी) ची निवड करणे ही कामाची पहिली पायरी आहे. स्थानिक भाषा, भूगोल, संसाधने यांच्याशी परिचित असलेली गावातील एखादी व्यक्ती सीआरपी म्हणून निवडण्यात येते. निवड झाले की सीआरपींचे प्रशिक्षण होते, ज्यात अभ्यास सत्रे आणि प्रात्यक्षिके दोन्हीचा समावेश असतो. त्यांना मनरेगा कायदा, कार्यवाही आदी विषयांची सविस्तर प्रशिक्षण दिले जाते. तसेच संवाद कौशल्ये, प्रशिक्षण कौशल्ये, गरजांची पडताळणी यांचाही त्यात असतो.
यानंतर सीआरपी गावातले मजूर, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि शासकीय यंत्रणेचे कर्मचारी यांच्या संपर्कात राहतात. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढला की ते तालुका व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांशी संवादही साधू लागतात. संस्थेने दर पंधरा दिवसांनी सीआरपींसोबत मिटींग घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या कामातल्या समस्या समजून येतात आणि त्या दूर कशा करता येतील याची चर्चा होऊ शकते.
खरीपाचा हंगाम संपला की नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना कामाची गरज असते. याच सुमाराला लोक कामासाठी गावाबाहेर जाऊ लागतात. ऊसतोडणी, बांधकाम, वीटभट्ट्या अशा कामांच्या ठिकाणी स्थलांतराला सुरुवात होते. सीआरपींनी ही वेळ साधली पाहिजे. स्त्री-पुरूष दोघांशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्या गरजा व अपेक्षा जाणून घ्याव्यात आणि त्यांना मनरेगाची माहिती द्यावी. मनरेगा म्हणजे गावातल्या गावात रोजगार आणि गावाचा विकास - हे सांगावे.
लोकांशी बोलताना त्यांच्या वैयक्तिक गरजा आणि गावपातळीवरच्या गरजा दोन्हीही जाणून घ्याव्यात. स्त्रियांच्या गरजाही समजून घेऊन त्यांना प्राधान्य द्यावे. यामध्ये जमीन सपाटीकरण, बंडींग, शेततळी, गोठे, गांडूळखत निर्मिती, अंतर्गत रस्ते, पाणी साठवण, वनीकरण इत्यादी अनेक प्रकारची कामे येऊ शकतात. मनरेगाची कामे सुरू होण्यासाठी आधी कामाची मागणी करणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी मागणीचा अर्ज भरावा लागतो. त्यात मागणी करणाऱ्या मजुरांची नावे, जॉब कार्ड क्रमांक, बँक खात्याचे तपशील भरावे लागतात. असा परिपूर्ण अर्ज भरायला सीआरपींनी मदत करावी. नंतर हे अर्ज ग्रामरोजगार सेवकाला किंवा ग्रामपंचायतीला द्यावेत. जर त्यांनी स्वीकारले नाहीत तर गटविकास कार्यालयात द्यावेत व पोचपावती घ्यावी.
हा टप्पा गाठणेही सोपे नसते. सीआरपींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो - लोक तयार होत नाहीत, लोकांचे गैरसमज दूर करावे लागतात, यंत्रणांचा थंडा प्रतिसाद देतात इत्यादी. अशा कितीही अडचणी आल्या तरी त्या पार करणे आवश्यक असते. त्यानंतरच प्रशासनाकडून लोकांच्या मागणीची दखल घ्यायला सुरुवात होते.
कायद्यानुसार मागणी अर्ज केल्यापासून १५ दिवसांच्या आत काम सुरू व्हायला पाहिजे. पण ज्या गावांनी मनरेगा कधी पाहिलीच नाही तिथे इतक्या कमी अवधीत काम सुरू होत नाही. काम मंजूर होण्यासाठी सततचा पाठपुरावा गरजेचा आहे. तेवढे करूनही पुरेसे काम सुरू होतेच असे नाही. बऱ्याचदा निघालेल्या कामाचा प्रकार, काम मिळालेल्या मजुरांची संख्या, कामाचे दिवस - गरजेपेक्षा खूप कमी असतो. लोकांनी कंटाळून जावे आणि पुन्हा मागणी करू नये यासाठी अशा गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात. लोक कितीही नाराज झाले तरी सीआरपींनी यावेळी सतर्क असले पाहिजे आणि योग्य प्रकारचे व पुरेसे काम मिळाले पाहिजे यासाठी पाठपुरावा करत राहिला पाहिजे. मागणीनुसार काम मिळणे हा लोकांचा अधिकार आहे आणि सीआरपींनी पाठपुरावा केला तरच हा अधिकार लोकांना मिळणार आहे.
लोकांकडून सातत्याने मागणी येऊ लागली की ग्रामपंचायत आणि पंचायत समितीलाही त्याची दखल घ्यावी लागते. लोकांना काम हवेच आहे आणि ते सतत पाठपुरावा करणार हे त्यांनाही समजून चुकते. तेव्हा सातत्याने वा पुरेसे काम न मिळण्यामागचे खरे कारण पुढे येते. मंजूर कामांचे “शेल्फ” तयार केलेले नाही ही जाणीव यंत्रणेला आणि लोकांना होते. शेल्फ म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सर्व मंजुऱ्या पूर्ण झालेली आणि अंमलबजावणीसाठी सज्ज असलेली कामे. ते असल्याशिवाय कामाची मागणी योग्यरित्या पूर्ण करणे अशक्य असते.
एकदा काम सुरू झाले की सीआरपी आणि मजुरांनी मिळून दररोज कामाची देखरेख केली पाहिजे. रोज दोनदा हजेरी झाली पाहिजे. मस्टर रोलमध्ये नोंदवून किंवा डिजिटली फोटो अपलोड करून हजेरी घेतली जाते. कामाच्या ठिकाणी मजुरांसाठी ज्या किमान सुविधा असायला पाहिजेत त्या आहेत की नाहीत हे सीआरपी आणि मजुरांनी पाहिले पाहिजे. यामध्ये पिण्याचे पाणी, विश्रांतीसाठी सावलीची जागा, प्रथमोपचार पेटी, कामाच्या माहितीचा फलक, नमुना खड्डा, आवश्यकता असेल तर लहान मुलांच्या देखभालीसाठी पाळणाघराची सोय इत्यादी.
याखेरीज पंचायत समितीच्या तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांनी दर आठवड्याला कामाचे मोजमाप घेतले पाहिजे. कारण कामाच्या मोजमापावरून वेतन ठरते. मोजमाप वेळेत झाले तर वेतन वेळेत मिळते. मोजमापाचे नियम सीआरपींनी शिकलेले असतात, त्यामुळे मजुरांना काही शंका आली, उशीर झाला तर ते मजुरांना मदत करू शकतात. मनरेगामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांना समान मजुरी मिळते. नियमानुसार काम पूर्ण झाल्यापासून १५ दिवसांच्या आत ती मिळायला हवी. पे ऑर्डर तयार केली जाते, मग पैसे ट्रान्सफर केले जातात व ते मजुराच्या खात्यात जमा होतात. कामाची मागणी ते कामाची सुरुवात ते कामाचे पेमेंट - या तीन टप्प्यांचे असे पंधरा-पंधरा दिवसांचे सायकल आहे. त्याचे काटेकोर पालन केले तरच मनरेगाची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकते.
भविष्यात गरजेप्रमाणे कामे मिळावीत यासाठी कामांचे शेल्फ तयार असणे गरजेचे असते. ते कसे करायचे ते आता पाहूया. पावसाळ्यात जेव्हा शेतीकामे चालू असतात तेव्हा सीआरपींनी शेतकऱ्यांबरोबर शेतातून व गावातून फेरफटका मारावा. शेतजमिनी, जंगलक्षेत्र, जलस्त्रोत, तलाव, सार्वजनिक जागा यांची पाहणी करावी व त्यांचा विकास करण्यासाठी कोणते काम केले पाहिजे याची चर्चा करावी. उदाहरणार्थ, तलावाचे खोलीकरणे करणे, सार्वजनिक इमारतींभोवती वनीकरण करणे, वाड्यावस्त्यांपासून शेतांना जोडणारे रस्ते करणे इत्यादी. तसेच लोकांना कोणत्या वैयक्तिक लाभाच्या योजना उपयुक्त ठरू शकतील हे त्यांच्याशी बोलून ठरवणे व त्याची अर्जप्रक्रिया सुरू करणे.
गरजा लक्षात आल्या की त्याचे प्रस्ताव तयार करावे लागतात. असे प्रस्ताव १५ ऑगस्ट आणि २ ऑक्टोबर या दोन ग्रामसभांमध्ये सादर केले जातात. ग्रामसभेत ठरावांना मंजुरी मिळाली की ते पंचायत समितीला तांत्रिक मुद्द्यांची तपासणी व मंजुरी यासाठी पाठवले जातात. गटविकास अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर ही सर्व कामे “मनरेगा शेल्फ” चा भाग बनतात. जेव्हा कामाची मागणी होते, तेव्हा ही कामे मंजूर होऊन त्यांची अंमलबजावणी केली जाते. समजा एखाद्यावरची शेल्फवरची सगळी कामे झाली नाहीत तरी ती रद्द होत नाहीत, ती पुढच्या किंवा त्यापुढील आर्थिक वर्षातही तशीच राहतात. ते अमुक वेळेत पूर्ण व्हायला हवीत असे बंधन नसते.
सीआरपींनी काम सुरू केल्यानंतर लगेचच्या वर्षात कामे सुरळीतपणे सुरू होत नाहीत. पहिले वर्षाचा अनुभव संमिश्र असतो. काही कामे निघतात, तर काही कामे पाठपुरावा करूनही होत नाहीत. मात्र हा पहिल्या वर्षाचा अनुभव सीआरपींना खूप शिकवून जातो, मनरेगाची व पूर्ण यंत्रणेची त्यांना नीट माहिती होते, त्यांचा व गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो, गावात मनरेगाची गरज आहे याची नोंद प्रशासकीय यंत्रणा घेते.
याच तयारीने आणि सातत्याने आणखी दोन वर्षे काम केले तर गावात मनरेगाची घडी बसून जाते. कामाची मागणी कशी करायची हे गावकऱ्यांना समजते, ते नियमित मागणी करू लागतात, गावातून मागणी येणार हे अधिकाऱ्यांनाही ठाऊक असते, कामाचे शेल्फ आधीपासून तयार केलेले असते, त्यामुळे मागणी केल्यावर वेळेत काम सुरू होते. म्हणजेच, मनरेगाची गाव पातळीवरील यंत्रणा कार्यान्वित होते.
हेच मनरेगाचे वैशिष्ट आहे. कारण मनरेगा ही अन्य योजनांसारखी प्रशासनाकडून राबवली जाणारी योजना नव्हे. तर ती लोकांच्या हक्काची आहे - आपला हक्क लोकांनी मागून मिळवला पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणी सर्वसहभागाने व सातत्याने नियोजनपूर्वक त्याचा वापर केला पाहिजे.
१००+
१००+
लक्ष्यित आदिवासी गावांमध्ये रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरात २०% घट.

२०१३ पर्यंत मनरेगा कायदा होऊन आठ वर्ष उलटली. कामांसाठी गावागावातून मागणीही होती हे स्वयंसेवी संस्थांना जाणवत होते. परंतु, शासकीय यंत्रणेपर्यंत ती मागणी पोहोचत नव्हती. देशभरातील हे सार्वत्रिक चित्र होते. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये त्यावर्षी स्वयंसेवी संस्थांनी ‘काम मांगो अभियान’ सुरू केले होते. त्यात
महाराष्ट्राची जबाबदारी प्रगती अभियानकडे होती. त्यावेळी संस्थेने नाशिक जिल्ह्यातील ३५ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हे अभियान राबविले. गावागावत रोहयोबद्दलची जनजागृती करण्यात आली. कामाच्या मागणीचे अर्ज तयार करण्यात आले. ते प्रशासनाला देऊन पोचपावत्या घेण्यात आल्या. प्रत्यक्षात गरज आणि प्रशासनाचे नियोजन यातील तफावत भरून काढण्यात याचा फायदा झाला.

दुष्काळप्रवण भागात पाणीसाठे वाढवण्यासाठी ठोस काम केलं पाहिजे हा ध्यास घेतलेल्या प्रगती अभियानच्या काही मित्रमंडळींनी मिळून ‘स्वाभिमान रोजगार योजना’ हाती घेतली. रोजगार हमी योजनेच्या धर्तीवरच आखलेली, मात्र खाजगी निधीतून राबवलेल्या या योजनेतून आमलोण तालुक्यातल्या चार गावात सलग तीन वर्षे कामे झाली आणि जलस्त्रोत सक्षम करण्यात आले.