बांबू आधारित आजिविका

बांबू आधारित आजिविका

भरड धान्याचे शेत

बांबू हा आदिवासींच्या जनजीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे. विशेषत: जंगलांलगत राहणारे आदिवासी समुदाय बांबूपासून केलेल्या टोपल्या, परड्या, मासे पकडण्याच्या जाळ्या, धान्याच्या कणग्या, कुंपण, लावणीच्या वेळी वापरायचे इरले इत्यादी वस्तूंचा वापर त्यांच्या दैनंदिन जीवनात करतात. त्यांच्या घराच्या वा शेताच्या आसपास विखुरलेली बांबूची झाडे त्यांच्या या गरजा भागवतात.

अलिकडच्या काळात, पर्यावरणाचा विचार करून प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यावर भर दिला जातो. ज्यामुळे पर्यावरण-स्नेही असलेल्या बांबूचे महत्त्व चर्चेत आले आहे. बांबूची मागणी वाढल्याने तयार झालेल्या या आर्थिक संधीचा लाभ आदिवासी शेतकऱ्यांना होऊ शकतो. बांबूची कापणी विशिष्ट वेळी व विशिष्ट प्रकारे केली असता त्यापासून अनेक वर्षे उत्पादन मिळू शकते. त्याकरिता बांबूची कापणी आणि विपणन योग्य प्रकारे कसे करायचे याची माहिती त्यांना होणे आवश्यक आहे.

या संदर्भाने प्रगती अभियान संस्थेने ‘महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाऊंडेशन’ या संस्थेच्या समवेत काम सुरू केले आहे. बांबूचे मूल्यवर्धन करून बांबू-आधारित आजिविका उभारण्याचे हे काम नाशिकच्या आदिवासी बहुल तालुक्यातील आठ एफपीओंच्या सहभागाने चालू आहे.

बांबू-आधारित आजीविका उभारणीचे मुख्य टप्पे:

  • प्रशिक्षण व कौशल्य विकास: परिपक्व बांबू ओळखून त्याची शास्त्रीय पद्धतीने कापणी कशी करायची याचे प्रशिक्षण घेतलेले गावातले तरूण ‘बांबू मित्र’ म्हणून काम करत आहेत.
  • संसाधनांचे मॅपिंग: कोबो कलेक्ट अॅपच्या द्वारे केलेल्या व्यापक सर्वेक्षणातून बांबूची उपलब्धता, त्यांच्या उपलब्ध प्रजाती, कापणी व देखरेखीच्या प्रचलित पद्धती यांचे माहिती संकलन होत आहे.
  • आवश्यक साधने व भांडवल यांचे सहाय्य: शास्त्रीय पद्धतीने बांबू कापणीसाठी आवश्यक असणारी कातणी, कुऱ्हाड, कोयता, हातमोजे अशी साधने एफपीओंना देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांकडून बांबू घेण्याची व त्याची विक्री करण्याची जबाबदारी एफपीओंची असून या कामांसाठी त्यांना सुरुवातीचे खेळते भांडवल देण्यात आले आहे.
  • समन्वय व समस्यांचे निवारण: एफपीओंना येणाऱ्या अडचणींचे वेळच्या वेळी निराकरण करणे, त्यांचा विक्रेत्यांसोबतचा समन्वय वाढवणे, एफपीओ प्रतिनिधींच्या मासिक बैठकीतून अनुभवांची देवाणघेवाण घडवणे - अशा गोष्टी काम सुरळीतपणे पुढे जाण्यासाठी आवश्यक असून त्याला चालना देण्यासाठी जिल्हास्तरीय ‘बांबू प्रकल्प समिती’चे गठन केले आहे.

 

कामाचे सुरुवातीचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. सुरुवातीच्या वर्षातच एफपीओंनी बांबू विक्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबूतून उत्पन्न मिळाले. कित्येक शेतकऱ्यांना त्यांनी पूर्वी लावलेल्या व वाढवलेल्या बांबूपासून पहिल्यांदाच कमाई झाली. बांबूचे मूल्यवर्धन करून त्याआधारे उद्योगाची उभारणी होऊ शकते हा विश्वास एफपीओंना आला असून आगामी काळात प्रकल्पाची व्याप्ती आणि सहभागी एफपीओंची संख्या वाढत जाईल.

Go Back Top