भरडधान्य पुनरुज्जीवनाची कारणे

नागलीचे पुनरुज्जीवन

आदिवासींच्या आहारातील मुख्य घटक असलेली नागली हे त्यांचे एक पारंपरिक पीक आहे. हलक्या आणि वरकस जमिनीवर घेतलं जाणारं हे तृणधान्य अत्यंत पौष्टिक आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे नागलीच्या लागवडीचे प्रमाण कमी होत चालले आहे. परिणामी आदिवासींच्या आहारातील नागलीचे प्रमाणही कमी होत चालले आहे. 

आदिवासींच्या शेतात व आहारात नागली पुर्नस्थापित करण्याच्या हेतूने प्रगती अभियानने नागलीचे उत्पादन वाढवण्यासाठीचा आनाविका (आदिवासी नागली विकास कार्यक्रम)ची सुरुवात प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली. यामध्ये मुख्य मदत झाली ती आरआरएएन (रिव्हायटलायझिंग रेनफेड अॅग्रिकल्चर नेटवर्क) म्हणजे कोरडवाहू शेती सुधारण्यासाठी तयार झालेले देश पातळीवरील  नेटवर्कची. आरआरएएनच्या मदतीने सुधारित शेतीपद्धती समजावून घेत २०१८ च्या खरीप हंगामात त्र्यंबकेश्वर, पेठ आणि इगतपुरी या ३ तालुक्यातील ९ गावांमध्ये १०० आदिवासी शेतकऱ्यांसोबत पायलट प्रकल्पाची सुरुवात झाली.

नागलीची उत्पादकता वाढवण्यासाठी लागवडीच्या सुधारित पद्धतींचा (पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस) अवलंब करण्यात आला. या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्था यांच्याशी विचारविनिमय करून आमच्या कार्यक्षेत्राला लागू होतील अशा या पद्धती आहेत. बीज प्रक्रिया, खते, कीड व रोग नियंत्रण इत्यादींसाठी विना-खर्च अथवा कमीत कमी खर्चात होणाऱ्या या पद्धतींमध्ये प्रामुख्याने परिसरात उपलब्ध गोष्टींचा वापर केला आहे.

बीजामृतसह बियांवर प्रक्रिया करणे

बीजामृतसह बियांवर प्रक्रिया करणे

रोपवाटिकेशीठी जमीन तयार करणे

रोपवाटिकेशीठी जमीन तयार करणे

रोपवाटिका बेडवर बियाणे पेरणे

रोपवाटिका बेडवर बियाणे पेरणे

शेत जमीन नांगरणी आणि तयार करणे

शेत जमीन नांगरणी आणि तयार करणे

१५ दिवसांची रोपे शेतात

काठी आणि दोरीच्या साहाय्याने चिन्हांकित केलेल्या ठिकाणी शेतात १५ दिवसांची रोपे लावणे

पहिली तण काढणी

पुनर्लावणीनंतर १०-१२ दिवसांनी सायकल वीडर किंवा हाताने पहिली तण काढणी

हांडी खत तयार करणे

स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या वनस्पतींपासून हांडी खत तयार करणे

कीड नियंत्रण

पाण्यात मिसळलेल्या निम तेलाची फवारणी करून कीड नियंत्रण

तयार झालेले पीक

तयार झालेले पीक

उत्पादनाचा अंदाज लावणे

उत्पादनाचा अंदाज लावणे

हा प्रयोग यशस्वी झाल्यावर तो अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे काम एप्रिल २०२१ ते मार्च २०११ या कालावधीत आदिवासी विकास विभागाच्या सहाय्याने केले. यात नाशिक, पालघर आणि ठाणे या तीन जिल्ह्यातले २००० हून अधिक आदिवासी शेतकरी सहभागी झाले. सीआरपी आणि पायलट प्रकल्पात सहभागी शेतकरी यांनी बाकी शेतकऱ्यांपर्यंत नेले आणि त्यांचा वापर करण्यासाठी मदत केली. सुधारित पद्धतीतून नागलीचे उत्पादन वाढले. याचा अनुभव शेतकऱ्यांना आल्यावर त्यांचा नागलीकडे ओढा वाढला. नागली लागवडीचे क्षेत्र वाढू लागले. उत्पादकता वाढीखेरीज अन्य फायदेही शेतकऱ्यांना जाणवले. शेतकरी गटांच्या पुढाकाराने स्थानिक प्रक्रिया केंद्रांची सुरुवात झाली आहे. नागलीची प्राथमिक प्रक्रिया गावपातळीवर होऊ लागली. पारंपरिक पद्धतीने नागलीवर प्रक्रिया करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांचे मानले जाई. मळणी, झोडपणी करण्याचे  काम वेळखाऊ आणि कष्टाचे होते. प्रक्रिया केंद्रांमुळे स्त्रियांचे या कामातील कष्ट कमी झाले. आहारातील नागलीचे प्रमाणही वाढू लागले आहे. कुटुंबात, शाळेत, अंगणवाडी व आश्रम शाळेत आहारातले नागलीचे प्रमाण वाढवणे यांवरही भर राहिला. नागली भाकरी, पेज या पारंपरिक पदार्थांबरोबरच आता नागलीच्या नव्या पाककृतींची ओळख त्यांना झाली. अंगणवाडी आणि आश्रम शाळांतील मुला–मुलींच्या आहारातही नागलीचा समावेश झाला. 

नागली हे पोषणयुक्त धान्य आहे, ज्याला ‘सुपरफूड’ मानले जाते, याखेरीज नागली हे पीक काटक असून हवामान बदलामध्ये टिकाव धरून राहू शकणारे म्हणजेच अन्न सुरक्षा देणारे पीक आहे. नागलीची उत्पादकता वाढवण्याचे हे मॉडेल स्थानिक परिस्थितीला अनुसरून कोणत्याही भागात लागू होण्यासारखे आहे. 

revival

नागलीचे लाडू, खीर, वडी मुले आवडीने खातात. मुलांनी नागली खाल्ली तर कुपोषण कमी व्हायला मदत होईल.” - चंद्रकला जाधव, अंगणवाडी सेविका, मोखाडा, पालघर

सहबिजनी

सहबिजनी म्हणजे स्थानिक वाणांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी केलेले सामूहिक प्रयत्न. शेतकऱ्यांची प्रयोगशीलता आणि त्यांच्याकडील अनुभवजन्य ज्ञानाची शिदोरी या आधारे नागलीच्या स्थानिक पारंपरिक वाणांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. आज हवामान बदलाच्या परिणामांची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे, त्यातून मार्ग शोधण्याचे प्रयत्नही त्यांनाच हाती घ्यावे लागणार आहेत.

सहबिजनी हा असाच एक संशोधन प्रकल्प आहेत उपलब्ध स्थानिक वाणांचे संकलन, शेतकऱ्यांच्या सहभागातून व शास्त्रीय पद्धतीतून पर्यावरणास अनुकूल वाणांची निवड आणि त्यांचे पुनरुज्जीवन - असे या संशोधनाचे टप्पे आहेत. या सहभागी संशोधनामध्ये नाशिक आणि आसपासच्या जिल्ह्यातले आदिवासी शेतकरी सहभागी आहेत. अधिक उत्पादक आणि प्रतिकूल हवामानातही टिकाव धरू शकणाऱ्या वाणांचा शोध घेणे हा या अभ्यासाचा मुख्य हेतू आहे. स्थानिक परिस्थितीसाठी नागलीचे कोणते वाण अधिक अनुकूल आहे याचा हा शोध अंतिमत: पर्यावरण-स्नेही रितीने अन्नसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठीचा आहे.

शेतकऱ्यांच्या सहभागाचे महत्त्व

सहबिजनी हा पार्टिसिपेटरी व्हरायटल ट्रायलची (PVT) प्रक्रिया आहे. नागलीची स्थानिक परिसरात प्रचलित विविध प्रकारच्या वाणांचा हा पद्धतशीर अभ्यास आहे. हवामान बदलाच्या काळात कोणते वाण अधिक टिकाव धरते, कोणाची उत्पादकता अधिक आहे आदी विविध गुणवैशिष्ट्ये ओळखणे, त्यांची तुलना करून पाहणे आणि स्थानिक पातळीवर अनुकूल वाण विकसित करणे - अशी ही दीर्घ प्रक्रिया आहे.

आम्ही याआधी शेतकऱ्यांसोबत नागली पुनरुज्जीवनाचे काम केले. जेव्हा शेतकऱ्यांनी स्वत:कडे साठवलेले बियाणे वापरले तेव्हा उत्पादकता वाढली - एकरी २.५ क्विंटलवरून एकरी ८ क्विंटल झाली - हे त्यावेळी दिसून आले. तसेच, विद्यापीठातर्फे दिले जाणारे फुले नाचणी व फुले केसरी यासारखे वाण स्थानिक वातावरणाला अनुकूल नसल्याचेही लक्षात आले. या अनुभवावरून आम्ही शेतकऱ्यांचा अनुभव, ज्ञान व निरीक्षणे यांना मध्यवर्ती ठेवून सहबिजनी प्रकल्पाची आखणी केली.

बियाणे संकलनापासून लागवडीच्या प्रयोगापर्यंतचा प्रवास

सहबिजनीची प्रक्रिया शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेतून सुरू झाली. ‘तुम्हाला कोणते वाण अधिक खात्रीचे, विश्वासाचे वाटते?’ - असे आम्ही त्यांना विचारले. त्यांनी स्थानिक वाणांना प्राधान्य दिले, कारण त्यांची हवामानातील चढऊतारांतही टिकाव धरण्याची क्षमता अधिक असते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

यानंतर आम्ही जामले गावात बियाणे महोत्सव घेतला. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले विविध प्रकारचे बियाणे आणले - एकूण २० प्रकारची नागली बियाणे शेतकऱ्यांनी यावेळी आणली. त्यांची शास्त्रीय पद्धतीने तपासणी केली. लागवडीच्या प्रयोगासाठी स्थानिक वाणातील नऊ वाण आणि विद्यापीठाकडून दिले जाणारे फुले नाचणी हे वाण - अशी दहा प्रकारची वाण घेतली. सुरुवातीला १४ शेतकरी प्रयोगात सहभागी झाले. प्रत्येकाला १० प्रकारची बियाणे, पर्जन्यमापक आणि नोंदवही देण्यात आली. ज्यावर शेतकऱ्यांनी आजवर धान्याची लागवड केली, त्यात शेताच्या एका हिश्श्यात त्यांनी आता नागली वाणांची प्रयोगशाळा उभी केली.

शेतकरी-संशोधकांची वाढती संख्या

जून २०२४ मध्ये सहबिजनी प्रक्रियेची सुरुवात झाली. सुरुवातीला सहभागी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण झाले आणि त्यांना दहा प्रकारच्या बियाणांचे वाटप केले. लागवडीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन केले गेले. ज्यामध्ये बीजप्रक्रिया, गादी वाफ्यावर रोपवाटिका, रोपांची ओळीने ठराविक अंतरावर लागवड करणे, कीडनियंत्रणासाठी जीवामृत व नीमतेलाचा वापर इत्यादी पद्धतींचा समावेश होता. त्यांचा अवलंब शेतकऱ्यांनी केला. तसेच प्रयोगाखालील प्रत्येक प्लॉटवरील रोपांच्या वाढीची निरीक्षणेही सविस्तरपणे नोंदवली.

पहिल्या वर्षी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पुढील वर्षी आणखी शेतकऱ्यांना प्रयोगात सहभागी व्हायला प्रेरित केले. त्यांनीच नव्या शेतकऱ्यांना प्रयोगातील लागवडींची प्रक्रिया आणि नोंदी ठेवण्याची पद्धती समजावून सांगितली. संशोधनात सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढली. प्रत्येक हंगामामध्ये कापणीनंतर प्रत्येक वाणाच्या नोंदींचे विश्लेषण सामूहिकरित्या केले जाते. कोणत्या भागात कोणती वाणे अधिक प्रभावी ठरली याची पडताळणी प्रत्येक शेतकरी घेतो आणि त्यानुसार पुढील वर्षांसाठी कोणत्या वाणांची निवड करायची हे ठरवतो.


शेतकऱ्यांचे बोलके अनुभव

सहबिजनी प्रक्रियेत सहभागी शेतकऱ्यांचे अनुभव उत्साहवर्धक आहेत. लागवडीबरोबर चोख नोंदी ठेवण्याचे व नोंदींआधारे विश्लेषणाचे तंत्र त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले आहे.

सहबिजनी ही जशी एक संशोधन प्रक्रिया आहे, तशीच ती शेतकरी समुदायाच्या पुढाकाराने चालणारी समुदाय शिक्षणाची महत्त्वाची प्रक्रियादेखील आहे. या प्रक्रियेत शेतकरी आपले ज्ञान पडताळून पाहात आहेत, आपले हक्क प्रस्थापित करत आहेत, आणि नवी बियाणे निवड प्रक्रिया विकसित करत आहेत.

Go Back Top