कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेक आदिवासी गावांनाही बसला. संसर्गप्रसार झाला आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. किती घरातील कर्त्या व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी केलेल्या पाहणीतून ज्यांना तातडीने मदतीची गरज आहे अशी ३५ कुटुंबे आम्हाला सापडली.
त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांच्या रोजगाराची सद्यस्थिती समजून घेतली आणि कोणत्या प्रकारची मदत त्यांना उपयोगी ठरेल हे जाणून घेतले. बऱ्याच कुटुंबांनी शेळीपालन व कुक्कुटपालनाला प्राधान्य दिले. तर काही कुटुंबांनी शिवणकाम, किराणा दुकार, बांगड्यांची विक्री असे बिगर-शेतीचे पर्याय निवडले.
पशुपालनाला प्राधान्य देणाऱ्यांना त्यांच्या परिचयाच्या असलेल्या स्थानिक वाणाच्या शेळ्या व कोंबड्या दिल्या. देखभाल करायला सोप्या असलेल्या आणि स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वाणांची निवड केली. तसेच या प्राण्यांचा निवारा, खाद्यान्न, आरोग्याची काळजी आणि लसीकरण या विषयांचे प्रशिक्षण त्यांची देखभाल करणाऱ्या स्त्रियांना देण्यात आले.
पशुपालन आणि विक्रीचे एक सायकल पूर्ण होईपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात राहून आम्ही लागेल ती मदत केली. आता तीनहून अधिक सायकल पूर्ण झाली आहेत. पशुपालनाची घडी सुरळीत झाली असून कुटुंबांची आवकही वाढली आहे.
