पिकाची कापणी झाल्यावर मळणीचे काम केले जाते. आदिवासी शेतकरी मुख्यत: घरच्यासाठी नागली पिकवतात, त्यामुळे कापणीनंतरची कामेही घरच्या घरी केली जातात. झोडपणी, मळणी, सफाई ही कामे वेळखाऊ आणि कष्टाची आहे. हे कष्टदायक कामे जास्त करून महिला करतात किंवा काही शेतकरी राईस मिलमधून नागलीची मळणी करत असत.
नागली पिकासाठीची मळणी यंत्रे गावात पूर्वी नव्हती. तसेच नागली पिकाला आवश्यक असलेली मळणी यंत्रे बाजारात सहजरित्या उपलब्धही नव्हती. संस्थेने लुधियाना व कोईंबतूर मधून सिंगल फेज, पोर्टेबल अशी सहा मळणी यंत्रे मागवली. ती गावात वापरणे व वेगवेगळ्या गावात नेणे शक्य झाले. यामुळे शेतकऱ्यांचे, विशेषत: महिलांचे, कष्ट कमी झाले आणि मळणीचे काम सुलभ झाले. धान्याचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी झाले. मळणीनंतरचा पेंढा पशुखाद्य म्हणून वापराता आला.
मळणीयंत्र शेतकऱ्यांना उपयोगी वाटले, त्यामुळे आम्ही सफाई, वर्गीकरण आदींअन्य यंत्रांचा समावेश करून गाव पातळीवर ‘धान्य प्रक्रिया केंद्रे’ उभारण्याचे ठरवले. ज्यामुळे धान्याची गुणवत्ता सुधारली व बाजारभाव अधिक मिळण्याची शक्यता वाढली. आरआरए नेटवर्क आणि वासन यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या मिलेट मेंटर या सीएसओच्या मदतीने आम्हाला गरजेची असलेली यंत्रे मिळवता आली.
ग्रामीण, अल्पशिक्षित लोकांना तंत्रज्ञान कुशल करण्याचे काम ‘पाबळ आश्रम’ तर्फे केले जाते. या संस्थेत शिकणारे कारागीर आणि गावातील शेतकरी यांनी मिळून शेडची बांधणी केली आहे.
अन्य कोणा कॉंट्रॅक्टरची मदत न घेता त्यांनी स्वत: प्रक्रिया केंद्रांची उभारणी केली. म्हणूनच उपलब्ध निधीचा वापर संपूर्णपणे शेडच्या बांधकामासाठी झाला.
गावात खात्रीशीररित्या वीजेची उपलब्धता नसते, हे लक्षात या केंद्रांसाठी सौरऊर्जेचा पर्याय निवडला असून त्यासाठी सेल्को फाऊंडेशनने मदत केली.
त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगणा या तीन तालुक्यात प्रत्येकी एक या प्रमाणे तीन प्रक्रिया केंद्रे सध्या चालू आहेत. स्थानिक शेतकरी उत्पादक संस्थांमार्फत त्यांचे व्यवस्थापन केले जाते. एक स्वतंत्र उद्योग म्हणून ही केंद्रे कार्यरत आहे.
